Story outline
-
गेटवे ऑफ इंडियामध्ये आपले स्वागत आहे
मुंबईच्या गजबजलेल्या बंदरावर वसलेले गेटवे ऑफ इंडिया वसाहतकालीन वास्तुकला आणि नागरी स्मृतीचे प्रतीक आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात बांधले गेलेले हे स्मारक आगमन, प्रस्थान आणि सार्वजनिक जीवनाचे साक्षीदार राहिले आहे; आज ते एक जतन केलेले स्मारक तसेच शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरील सजीव केंद्र म्हणून उभे आहे. -
Stop 1. एक साम्राज्यिक प्रवेशद्वार
१९११ च्या राजेशाही भेटीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले गेटवे सुरुवातीला तात्पुरत्या प्लास्टरच्या कमानीच्या स्वरूपात होते; त्यानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कायमस्वरूपी दगडी वास्तू उभारण्यात आली, जी साम्राज्यिक समारंभ, सत्ता आणि शहराच्या वसाहतकालीन ओळखीला आकार देणारे भव्य प्रवेशद्वार दर्शविण्यासाठी होती. -
Stop 2. बंदराकडे जाण्याचे प्रवेशद्वार
बंदराच्या दिशेने पाहिल्यास, गेटवे हे समुद्रकिनाऱ्यावरील एका गतिमान प्रवेशसीमेप्रमाणे उभे दिसते, जिथून होड्या आणि नौका मुंबईला दूरवरच्या किनाऱ्यांशी जोडतात. हे केवळ एक महत्त्वाचे स्थळ नाही, तर आगमन आणि प्रस्थानाचे प्रतीक आहे, ज्याचा अर्थ इतिहासाने आणि जमीन व समुद्रमार्गे सतत होत असलेल्या लोकांच्या हालचालींनी घडवला आहे. -
Stop 3. एकत्र येण्याचे ठिकाण
गेटवे ऑफ इंडिया हे एकाच वेळी एक ऐतिहासिक स्मारक आणि भेटण्याचे ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावरील एका सार्वजनिक चौकाप्रमाणे येथे स्थानिक लोक आणि पर्यटक एकत्र येतात, फोटो काढतात आणि वेळ घालवतात. दैनंदिन वापरामुळे त्याच्या वसाहतकालीन सुरुवातीला नवे जीवन मिळाले असून, ते मुंबईच्या सामुदायिक जीवनाचे आणि बदलत्या ओळखीचे जिवंत प्रतीक बनले आहे. -
Stop 4. दीर्घकाळ टिकण्यासाठी बांधलेले
टिकाऊ आणि त्याच वेळी काम करण्यास सोपे असलेल्या ट्रॅकाइट दगडातून कोरलेले गेटवे संरचनात्मक मजबुती आणि सूक्ष्म आकार दिलेल्या तपशीलांचे संयोजन करते. त्याचे भव्य स्वरूप आणि ज्वालामुखीय दगडाची व्यावहारिक निवड यांमधून मोठ्या प्रमाणावरील बांधकाम आणि कलात्मक परिष्कार यांचा संगम दिसून येतो. -
Stop 5. समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा परिणाम
समुद्रातील हवा, आर्द्रता आणि प्रदूषणामुळे गेटवेच्या दगडाचा रंग गडद झाला असून त्याची झीज झाली आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून सुरू असलेले संवर्धन, वारंवार केली जाणारी स्वच्छता आणि देखभाल यांमुळे त्याचे स्वरूप सुरक्षित ठेवले जात आहे आणि यामुळे स्मारकाच्या जीवनात जतनकार्य हा सतत चालणारा भाग असल्याचे अधोरेखित होते. -
Stop 6. स्मारकाची रचना
गेटवेच्या मध्यवर्ती कमानीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दोन मंडपांमध्ये टोकदार कमानी आणि सममितीय रचनेचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे औपचारिक आणि समारंभिक स्वरूपाची बाह्यरेषा तयार होते. प्रादेशिक इस्लामी वास्तुकला परंपरांमधून प्रेरणा घेतलेले हे स्मारक मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रभावीपणे उभे असून आजही शहराच्या नागरी ओळखीचे सहज ओळखता येणारे प्रतीक आहे. -
Stop 7. अलंकरण आणि स्थापत्याचे तपशील
गेटवेवरील नाजूक जाळीदार जाली आतील आणि बाहेरील भागामधील सीमारेषा निश्चित करते. त्यातून प्रकाश आणि हवा आत येते आणि त्याच वेळी हे स्मारक दक्षिण आशियाई वास्तुकला परंपरांशी जोडले जाते. अशा तपशीलांमधून वसाहतकालीन प्रभावांसोबतच प्रादेशिक साहित्य, आकार आणि कारागिरीने त्याच्या रचनेला कसा आकार दिला हे दिसून येते. -
Stop 8. बदलता अर्थ
ब्रिटिश राजवटीच्या काळात साम्राज्यिक प्रतीक म्हणून उभारलेले गेटवे ऑफ इंडिया पुढे १९४८ मध्ये ब्रिटिश सैन्याच्या भारतातून झालेल्या प्रस्थानाचे साक्षीदार ठरले आणि त्यामुळे ते अनेक स्तरांचा इतिहास असलेले स्मारक बनले. आज त्यामध्ये वसाहतकालीन वारसा आणि स्वातंत्र्योत्तर स्मृती या दोन्हींचा समावेश आहे आणि सार्वजनिक जीवन व बदलत्या अर्थांमुळे त्याला नवे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आवाज
-
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
व्याख्याते आणि सल्लागार
CyArk
आंद्रे बाप्तिस्ता हे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विषयांचे व्याख्याते व सल्लागार आहेत. त्यांच्या संशोधनाच्या आवडींमध्ये एका बाजूला प्रागैतिहास, मानव-भू-दृश्य संबंध आणि भू-दृश्याचा विकास, तर दुसऱ्या बाजूला वसाहतकालीन इतिहास, नागरी विकास आणि सामाजिक-सांस्कृतिक अवकाशांची निर्मिती यांचा समावेश होतो. त्यांनी भारतातील पुणे येथील डेक्कन कॉलेज पोस्टग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून भू-दृश्य आणि पर्यावरणीय पुरातत्त्वशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली आहे. प्रागैतिहासिक काळापासून प्रारंभिक मध्ययुगीन काळापर्यंतच्या विविध स्थळांवरील अनेक शोधमोहीमा आणि उत्खननांमध्ये आंद्रे यांनी विविध विद्यापीठांचे तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे प्रतिनिधित्व केले आहे.
गॅलरी
भागीदार
About the Project
हा Tapestry अनुभव २०१७ मध्ये CyArk द्वारे संकलित केलेल्या 3D डेटाचा वापर करून आणि पुरातत्त्वज्ञ व प्राध्यापक डॉ. आंद्रे बाप्तिस्ता यांच्या तज्ज्ञ मुलाखतींसह विकसित करण्यात आला आहे. गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास, वास्तुकला आणि अर्थ सामायिक करण्यासाठी हा अनुभव तयार करण्यात आला असून, यामुळे आपणास भारतातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या स्मारकांपैकी एका स्मारकाकडे अधिक जवळून पाहण्याची संधी मिळते.
संबंधित दुवे
क्रेडिट्स
गेटवे ऑफ इंडियाचे 3D दस्तऐवजीकरण Seagate कडून मिळालेल्या अनुदानामुळे शक्य झाले. डॉ. आंद्रे बाप्तिस्ता आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे त्यांच्या सहकार्य आणि पाठिंब्यासाठी विशेष आभार. भाषांतर आणि व्हॉइसओव्हरचे काम कु. रिद्धी जोशी यांनी केले.
.png)