गेटवे ऑफ इंडियामध्ये आपले स्वागत आहे
गेटवे ऑफ इंडिया येथे आपले स्वागत आहे. हे मुंबईतील सर्वाधिक परिचित स्थळांपैकी एक आहे. जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एका शहराच्या बंदराला लागून वसलेला हा समुद्रकिनारा आदळणाऱ्या लाटा, पाण्यावरून ये-जा करणाऱ्या नौका आणि शहराच्या टोकाशी एकत्र येणाऱ्या लोकांची लगबग अश्या सततच्या हालचालींनी सदैव जिवंत भासतो. ब्रिटिश राजवटीच्या काळात बांधलेला हा गेटवे साम्राज्य, स्थापत्यशास्त्र आणि सार्वजनिक जीवन यांचा बहुस्तरीय इतिहास आपल्यात सामावून आहे. आजही हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्मारक तसेच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवनाचा एक सक्रिय भाग आहे. याची देखभाल महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून केली जाते. या स्थळाचा अनुभव घेत असताना, आपण, इथल्या हालचाली, स्मृती आणि शहराच्या अखंड जीवनप्रवाहातून हे ठिकाण भूतकाळ आणि वर्तमानाला कशाप्रकारे जोडते, याचा विचार करा.
Stop 1. एक साम्राज्यिक प्रवेशद्वार
गेटवे ऑफ इंडिया हे राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या १९११ मधील भारतभेटीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. मात्र, स्मारकावरील फलकावरून दिसते त्यापेक्षा याची कथा अधिक गुंतागुंतीची आहे. त्यांच्या भेटीच्या वेळी येथे उभी असलेली वास्तू केवळ प्लास्टर आणि पुठ्ठ्यापासून बनवलेली एक तात्पुरती समारंभिक कमान होती. आज आपण पाहत असलेले दगडी स्मारक मुंबईच्या किनाऱ्यावर एक कायमस्वरूपी वास्तू म्हणून नंतर उभारण्यात आले. सुरुवातीपासूनच गेटवेचे महत्त्व हे केवळ एक प्रवेशद्वार एवढेच नव्हते. त्यासोबतच समुद्राच्या किनारी समारंभ, सत्ता आणि साम्राज्याच्या उपस्थितीचे प्रदर्शन घडवून आणण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती.
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
गेटवे ऑफ इंडियाच्या जमिनीच्या बाजूच्या दर्शनी भागावर,आणि समुद्राच्या बाजूच्या दर्शनी भागावर बसवलेल्या फलकावर नमूद केले आहे की गेटवेची निर्मिती 1911 मध्ये जॉर्ज पंचम आणि मेरी ऑफ टेक यांच्या भारताला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ करण्यात आली. मात्र, हा फलक गेटवेच्या इतिहासातील जितकी माहिती उघड करतो त्यापेक्षा अधिक माहिती लपवतो. जॉर्ज पंचम आणि राणी मेरी ऑफ टेक भारतात आले होते दिल्ली दरबारात सहभागी होण्यासाठी, भारताचा सम्राट म्हणून घोषित करणारी राज्याभिषेकाची समारंभिक घटना राज्याभिषेकाची समारंभिक घटना होती,मात्र त्या वेळी येथे केवळ एक तात्पुरती संरचना उभी करण्यात आली होती. ही तात्पुरती संरचना प्लास्टर आणि पुठ्ठ्यापासून बनवण्यात आली होती.
Stop 2. बंदराकडे जाण्याचे प्रवेशद्वार
बंदराच्या दिशेने पाहिल्यास गेटवे सतत हालचालींनी भरलेल्या समुद्रकिनाऱ्याचा एक भाग असल्याचे दिसते. नौका आणि होड्या ये-जा करत मुंबईच्या या किनाऱ्याला खाडीपलीकडील तसेच त्याही पुढील विविध ठिकाणांशी जोडतात. येथे हे स्मारक जमीन आणि पाणी, आगमन आणि निर्गमन यांना जोडण्याचे कार्य करते. हे केवळ एक महत्त्वाचे स्थळ नाही, तर इतिहासाबरोबरच शहरातून आणि समुद्रमार्गे होणाऱ्या लोकांच्या सततच्या हालचालींनी आकार घेतलेले एक प्रवेशद्वार आहे.
Stop 3. एकत्र येण्याचे ठिकाण
अनेक लोकांसाठी गेटवे ऑफ इंडिया हे एकत्र येण्याचे ठिकाणदेखील आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटक येथे मित्रांना भेटण्यासाठी, समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि मुंबईतील एका अत्यंत प्रतिष्ठित सार्वजनिक ठिकाणी वेळ घालवण्यासाठी येतात. रोजच्या जीवनातील ही हालचाल स्मारकाला त्याच्या मूळ उद्देशापलीकडे एक वेगळे जीवन देते. हे केवळ पाहण्याचे ठिकाण नाही, तर येथे उपस्थित राहण्याचे आणि अनुभवण्याचे ठिकाण आहे: असे ठिकाण जिथे पर्यटन, दैनंदिन जीवन आणि सामायिक अनुभव त्याच्या अर्थाला सतत नवा आकार देत राहतात.
Stop 4. दीर्घकाळ टिकण्यासाठी बांधलेले
गेटवेची निर्मिती ट्रॅकाइट या ज्वालामुखीजन्य दगडापासून करण्यात आली आहे. हा दगड टिकाऊ असून त्यावर तुलनेने सहजपणे काम करता येते. या दोन्ही गुणांमुळे अशा प्रकारच्या स्मारकासाठी हा दगड विशेषतः योग्य ठरला. कारण वास्तूची एकूण रचना मजबूत असण्याबरोबरच त्यावर स्पष्ट आणि बारकावे असलेले तपशील कोरण्यासाठी योग्य अशा साहित्याचीही गरज होती. मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरांमधून आणलेल्या या दगडामुळे गेटवे मजबूत तसेच सुबक बनले. परिणाम म्हणजे त्यातून अशी वास्तू निर्माण झाली जी एकाच वेळी भव्य आणि परिष्कृत भासते; तिची मजबुती आणि सूक्ष्म तपशील या दगडाच्या गुणधर्मांमध्येच रुजलेले आहेत.
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
गेटवे ऑफ इंडिया ट्रॅकाइट या दगडापासून बांधलेले आहे,जो अग्निजन्य उत्पत्तीचा बेसॉल्टिक खडकाचा एक प्रकार आहे. त्याची स्पर्शातून जाणवणारी मजबुती तसेच त्यावर काम करणे सुलभ असल्यामुळे बांधकामासाठी हा अत्यंत सोयीचा खडक आहे.
Stop 5. समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा परिणाम
समुद्रकिनाऱ्यावरील जीवन गेटवेवर आपली छाप सोडते. आर्द्रता, समुद्रातील खारट हवा आणि प्रदूषण यांचा कालांतराने दगडावर परिणाम होतो. यात वातावरणातील प्रदूषक आणि ओलावा एकत्र आल्याने तयार होणाऱ्या काळ्या थरांचाही समावेश होतो. अशा स्मारकाचे जतन करण्यासाठी सातत्याने देखभाल करणे आवश्यक असते. गेटवेचे स्वरूप आणि स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या देखरेखीखाली वारंवार स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. हवामानामुळे होणाऱ्या झीजेची ही चिन्हे आपल्याला आठवण करून देतात की संवर्धनाचे कार्य कधीच पूर्ण होत नाही. ते शहरातील स्मारकाच्या सतत सुरू असलेल्या जीवनाचा एक भाग आहे.
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
मुंबईतील उच्च आर्द्रतेमुळे, तसेच वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या पातळीमुळे, बहुतांश इमारतींना भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे येथील काळ्या थरांची समस्या. हे काळे थर स्मारकांच्या पृष्ठभागावर चिकटतात आणि ते दुसरे काही नसून सल्फर डायऑक्साइड प्रदूषणातील वायू वातावरणातील जलवाष्पात मिसळल्यामुळे निर्माण झालेले थर आहेत.
Stop 6. स्मारकाची रचना
गेटवेची रचना एका मोठ्या मध्यवर्ती कमानीभोवती आणि त्याच्या बाजूच्या दोन छोट्या मंडपांभोवती आखलेली आहे. टोकदार कमानी स्मारकाला त्याची उंची आणि समारंभिक भव्यता देतात, तर एकूण रचना शहर आणि समुद्र दोन्ही बाजूंनी दिसणारी संतुलित आकृती तयार करते. या वास्तुच्या स्वरूपांवर या प्रदेशातील इस्लामी स्थापत्य परंपरांचा प्रभाव दिसून येतो. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे गेटवेची औपचारिक, सममितीय आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर क्षणात दिसून येणारी अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
गेटवेला एक मध्यवर्ती किंवा मुख्य मंडप आहे आणि दोन उपमंडप आहेत. हे मंडप इस्लामी स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्यपूर्ण घटकही आहेत. त्यांच्यावर टोकदार कमानी आहेत, ज्या या संरचनांची मोठी उंची समर्थित करण्यास मदत करतात.
Stop 7. अलंकरण आणि स्थापत्याचे तपशील
गेटवेकडे बारकाईने पाहिल्यास, त्याचे लहान लहान बारकावे उलगडतात, जे त्याच्या अनुभवाला आकार देतात. त्यापैकी एक म्हणजे जाळी. ही जाळी आत आणि बाहेर यांच्यातील सीमा निश्चित करते, तसेच प्रकाश आणि हवा आत येऊ देते. अशा तपशीलांमुळे हे स्मारक दक्षिण आशियामध्ये आढळणाऱ्या स्थापत्य परंपरांशी जोडले जाते. यावरून असे दिसून येते की गेटवेची रचना केवळ त्याच्या वसाहतकालीन संदर्भामुळे आकाराला आलेली नसून, प्रादेशिक स्वरूपे, साहित्य आणि बांधकामाच्या पद्धती यांनीदेखील तिच्यावर प्रभाव टाकला आहे.
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
जाळीकाम किंवा भारतात ज्यांना जाली म्हणून ओळखले जाते, यांचा वापर जाळीदार पडदे म्हणून केला जात असे. ते बाह्य आणि अंतर्गत अवकाशांमध्ये सीमा निश्चित करत तसेच प्रकाश आणि हवा आत येण्यासही अनुमती देत असत.
Stop 8. बदलता अर्थ
कालांतराने गेटवे ऑफ इंडियाचा अर्थ मूलभूतरित्या बदलला आहे. ब्रिटिश राजवटीत बांधलेले हे स्मारक सुरुवातीला साम्राज्याच्या अधिकाराचे प्रतीक म्हणून उभे राहिले. मात्र, १९४८ मध्ये भारतातून शेवटच्या ब्रिटिश सैन्यदलाचे निर्गमन इथून झाले तेव्हा स्मारकाच्या इतिहासातील एक पूर्णपणे वेगळा क्षण त्याच्याशी जोडला गेला. आज गेटवे साम्राज्याचा वारसा आणि स्वातंत्र्य, सार्वजनिक स्मृती व दैनंदिन जीवनामुळे नव्याने घडवलेले एक ठिकाण, या दोन्ही इतिहासांना एकाच वेळी घेऊन उभा आहे. आज आपण त्याच्याकडे पाहताना, याचा विचार करा की किती स्मारके ज्या उद्देशांसाठी बांधली जातात त्यापेक्षा त्यांच्या सभोवतालचे जग बदलत असताना, ती अधिक काळ कशी टिकून राहतात आणि त्यांना नवे अर्थ कसे प्राप्त होतात.
डॉ. आंद्रे जे. जे. बाप्तिस्ता (PhD)
गेटवे ऑफ इंडियावर पाहायला मिळणारी विविध वैशिष्ट्ये. भारताच्या स्वतःच्या संकल्पनेला आकार देणारी विविध वैशिष्ट्ये. बहुविधता, सर्वसमावेशकता, एकत्रीकरण, आणि विविध संस्कृतींचे आत्मसातीकरण करून संस्कृतींच्या या वैभवशाली मिश्रणाचे स्वरूप निर्माण करणे. गेटवे ऑफ इंडिया ब्रिटिशांनी बांधले आणि ते त्या अधीनतेचे प्रतीक होते. तसेच १९४८ मध्ये भारतात तैनात असलेल्या शेवटच्या ब्रिटिश सैन्यदलाच्या माघारीचेही हे ठिकाण साक्षीदार ठरले, आणि त्या क्षणी ते स्वातंत्र्याचे प्रतीक बनले. हा विरोधाभासच खऱ्या अर्थाने जाणवतो. जेव्हा एखादी व्यक्ती गेटवे ऑफ इंडियासमोर उभी राहते. हे साम्राज्याच्या वारशाचे साक्षीदार आहे. हे ब्रिटिश राजवटीचे साक्षीदार आहे. परंतु त्याच वेळी, हे हिंदू कामगारांच्या श्रमाचेही साक्षीदार आहे, आणि त्याच्या बांधकामासाठी लागलेल्या घामाच्या व अथक परिश्रमाच्या हातांचेही साक्षीदार आहे.